आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळ, उपलब्ध इलेक्टॉनिक मतदान यंत्र आदींबाबत सूक्ष्मरितीने पूर्वनियोजन करा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक पूर्व तयारी संदर्भात श्री. वाघमारे यांनी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

