आपली संस्कृती, संतांचे विचार व परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
श्री क्षेत्र टाळगाव, चिखली येथे वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन व सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, संतपीठाचे संचालक डॉ. सदानंद मोरे, चिंतन समिती, संतपीठ समितीचे पदाधिकारी तसेच पालक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभलेली आहे. संतपरंपरा जपण्याचे काम संतपीठात होणार आहे. या ठिकाणाला वैश्विक स्वरुप देण्याचे काम करण्यात आले असून येथे संपूर्ण संतसाहित्य ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी या चारही भाषांमधून शिकविले जाणार आहे. विविध वाद्य वादनाचे प्रशिक्षणही याठिकाणी देण्यात येणार आहे.

