संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अर्थात ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक सुहृदयी उपक्रम म्हणून सुरू केलेली ही मोहीम आज एक चैतन्यशील, बहु-विद्याशाखीय शैक्षणिक परिसंस्थेत रूपांतरित झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
सिम्बायोसिस विश्वभवन येथे सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या डॉ. एस. बी. मुजुमदार यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, श्रीमती संजीवनी मुजुमदार, सकाळ मीडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व्यासपीठावर उपस्थित होते.

