शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याची गरज आहे, शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून नवीन पिढी घडविण्याकरीता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करावे. राज्यात विविध प्रयोगशील शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवित असून त्यांच्या उपक्रमाचे इतर शिक्षकांनीही अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने श्री गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

शैक्षणिक दर्जा सुधारण्याकरीता राज्य शासनाचा पुढाकार
श्री. पवार म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, याकरीता राज्य शासनाच्यावतीने अंगणवाडी पासून पदव्युत्तर शिक्षणाकरीता १ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या खोल्या उभारण्याकरीता अग्रक्रम देण्यात येत आहे. जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हजारो वर्षापासून मराठी भाषेचे असलेले अस्तित्व टिकविण्यासाठी इंग्रजी शाळेत पहिलीपासून मराठी भाषा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सुविधांनीयुक्त उत्कृष्ट ‘शालेय शिक्षण भवन’ उभारण्यात येत असून लवकर त्याचे उद्धघाटन करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्यावतीने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत मोठया प्रमाणात निधी मिळण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे, याकरीता विविध सामाजिक संस्था, विविध कंपन्या प्रतिसाद देत आहेत.

सरपंच आणि ग्रामपंचायतीने गावातील शिक्षणाची जबाबदारी घ्यावी
शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायतीने सामाजिक जबाबदारी ओळखून गावातील शिक्षणाची जबाबदारी घेऊन शिक्षण लोकचळवळ झाली पाहिजे. ग्रामसभेत शाळा कामकाजाचा आढावा घ्यावा, प्रत्येक गावात शैक्षणिक मेळावे घ्यावेत. शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. उच्च् पदावर कार्यरत अधिकाऱ्यांनी विद्यार्थी या नात्याने शाळेला मदत केली पाहिजे. शाळेचा दर्जा सुधारण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात पारदर्शकता, गुणवत्ता, दर्जा वाढीसोबतच आवश्यकतेप्रमाणे बदल केले पाहिजे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत असून याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात वापर करण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले.

शिक्षणामुळे जीवनातील आव्हाने पेलण्याकरीता स्वत:ला सक्षम आणि संयमी बनविण्याचे कार्य
नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सुशिक्षित नागरिक देशाच्या वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीत अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचे आचार, विचार, उच्चार हे विकसित होत असतात. शिक्षणामुळे पुरोगामी सत्यशोधक पद्धतीने विचार करण्याची सवय लागते, सुसंस्कृत समाज घडतो, शिक्षण मानवाला विचार करण्याची ताकद देते, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते तसेच जीवनातील आव्हाने पेलण्याकरीता स्वत:ला सक्षम आणि संयमी बनविण्यासोबतच आपले हक्क व कर्तव्य व जबाबदारीची जाणीवही होते. आपला देश, समाज सुखी, समृद्ध, सुसंस्कृत घडविण्यासाठी शिक्षण हाच उत्तम पर्याय आहे म्हणून शिक्षणाकडे भविष्यातील गुंतवणूक म्हणून बघितले पाहिजे, यासर्व गोष्टींचा विचार करता राज्यशासनाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शिक्षणाची चळवळ उभी केली असून ही चळचळ अधिक मजबूत करण्याकरीता समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *