व्यवसाय उभारणीसाठी केंद्राच्या सहकारी संस्थांबाबतच्या नव्या कायद्याची माहिती घ्यावी – मंत्री दिलीप वळसे पाटील

व्यवसाय उभारणीसाठी केंद्राच्या सहकारी संस्थांबाबतच्या नव्या कायद्याची माहिती घ्यावी – मंत्री दिलीप वळसे पाटील

विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी आता फक्त कर्ज घेऊन वाटप करणे आणि वसूल करणे एवढेच काम करणे अपेक्षित नसून आता केंद्र सरकारच्या सहकार विभागाने आणलेल्या नवीन कायद्यानुसार या संस्थांना १५१ प्रकारचे विविध व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. संस्थांच्या चेअरमन आणि सोसायट्यांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवाव्यात, असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

अवसरी (ता. आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कवयित्री शांता शेळके सभागृहात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने आयोजित सहकार परिषद व बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, सहकारी संस्थाचे पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना बक्षीस वितरण आणि सहकार क्षेत्रात घडत असलेले बदल आणि त्या अनुषंगाने संस्थांनी निश्चित करावयाची दिशा या अनुषंगाने या सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, संस्था जपली तर आपल्याला त्यांची मदत होईल. शेतकऱ्याला पीक कर्ज, अन्य कोणतेही कर्ज वाटप, शैक्षणिक कर्ज आदींसाठी जिल्ह्यात चांगले काम आहे. सोसायट्यांनी शिस्तीने कारभार केला नाही तर तोटा वाढतो, कर्ज वाटप करून वसूली होत नसल्याने तोटा वाढतो व सोसायटी बंद पडली तर त्याचा त्रास शेतकऱ्याना होतो. बऱ्याच सोसायट्या अनिष्ट तफावतीमध्ये जातात. सोसायटीत अडचणीत आल्यास शेतकऱ्याला कर्जासाठी सावकाराकडे जावे लागते. ते किती तरी जास्त टक्केवारीने घेत असल्याने लोकांना त्रास होतो. त्यामुळे आपल्या संस्था जपल्या पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे कारभार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *