‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आदींनी सहभागी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करुन यशस्वीपणे करण्याकरीता पुढाकार घ्यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी प्रशासनास दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम,  पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे सकाळी ७.३० वाजता आयोजन करण्यात येणार आहे. योग कार्यक्रमास विविध मान्यवरांसह वारकरी सहभागी होऊन योग करणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पूर्व तयारी करावी.

शहरातील विविध शाळांमध्येदेखील वारकरी भक्तीयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे, यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनासहित स्वयंसेवकांना बसण्याच्या जागेसह, ओळखपत्र, एकसारखे टीशर्ट, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी उपलब्ध करुन द्यावेत. शाळेत योगाकरीता लागणाऱ्या लागणाऱ्या सर्व सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्याव्यात.

वारकरी भक्तीयोग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, याकरीता क्युआर कोड, फेसबुक लाईव्ह, अधिकाधिक वारकऱ्यांचा सहभागी होतील याकरीता अधिकाधिक जनजागृती करावी. यामध्ये शहरातील विविध भागात विशेषत: दिंडीचा मुक्कामाचे ठिकाण, मार्गावार महानगरपालिकेने जाहिरात फलके लावावीत. एकंदरीत वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

कार्यक्रमाचे संयोजक व संकल्पक राजेश पांडे यांनी ‘वारकरी भक्तीयोग’ नियोजनाबाबत माहिती दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *