संशोधन चलित शिक्षण, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि शैक्षणिक बाबींसाठी उद्योगांसमवेत सहयोग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. यशोधरा हरिभक्त आदी उपस्थित होते.
सीओईपी ही संस्था शैक्षणिक उत्कृष्टतेची दीपस्तंभ असून संस्थेच्या पहिल्या पदवीदान समारंभास उपस्थित राहताना आनंद होत असल्याचे सांगून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर दीर्घकाळापासून शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचे केंद्र आहे. ही संस्था केवळ शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि संपूर्ण देशात तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि शैक्षणिक विद्वत्तेचे केंद्र म्हणून आपली एक वेगळी प्रतिष्ठा जपत असताना भरभराट करत आहे.
तांत्रिक प्रगती, शैक्षणिक, संशोधन आणि विशेषत: महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सीओईपीने मोठी प्रगती केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी विद्यापीठाची दृढ वचनबद्धता उल्लेखनीय आज पदवी मिळविणाऱ्या मुलींच्या मोठ्या संख्येतून दिसून येते. पदवीदान समारंभातील दीक्षांत मिरवणुकीचे नेतृत्व एक महिला करत असल्याचे पाहून विद्वान, नेतृत्व आणि बदल घडवणाऱ्या म्हणून स्वतःची भरभराट करू शकतील अशा महिलांसाठी सर्वसमावेशक वातावरणास प्रोत्साहन देण्याची विद्यापीठाची समर्पण भावना दिसून येते, असेही राज्यपाल म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले, ‘स्टडी इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील विविध राज्ये तसेच जगभरातील देशांतील विद्यार्थ्यांचे स्वागत करून विविधतेला चालना देण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न विशेष मान्यता मिळण्यासाठी पात्र आहेत. ही समृद्ध विविधता केवळ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभवच वाढवत नाही तर त्यांना जागतिक नागरिक बनण्यासाठी, सीमांचे बंधन तोडून आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करते. सीओईपी सारख्या संस्थांद्वारेच आपण एक स्वावलंबी भारत घडवू, जिथे ज्ञान आणि कौशल्य विकास हातात हात घालून चालेल, आपल्या तरुणांना प्रगती आणि परिवर्तनाचे अग्रदूत होण्यासाठी सक्षम करेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

