भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत रहावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दूरदृष्य प्रणालीद्वारे ते उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सर व्यवस्थापक संजय शितोळे उपस्थित होते.

