प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला देश पुढे राहील हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे, यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा पहिले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्रातून मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल धीरज शेठ, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री श्री.शाह म्हणाले, पहिल्या बाजीरावांनी तंजावर ते अफगाणीस्तानपर्यंत आणि अफगाणीस्तान ते बंगाल कटकपर्यंत मोठ्या हिंदवी साम्राज्याची स्थापना केली जे छत्रपती शिवरायांचे स्वप्न होते. बाजीरावांनी युद्ध नियोजनातील वेग, रणकौशल्य, रणनीती आणि वीर सोबत्यांच्या साथीने अनेक पराभवांना विजयात रुपांतरीत केले. पालखेडच्या विजयाचा अभ्यास बारकाईने केल्यास हा अकल्पनीय होता हे लक्षात येईल. गुलामीचे निशाण उध्वस्त करुन स्वातंत्र्याचा दीप लावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. देश-विदेशातील अनेक युद्धकौशल्यातील अभ्यासू सेनानींनी त्यांच्या युद्धकौशल्याविषयी गौरविले आहे.

युद्धनीतीचे काही नियम हे कधीच कालबाह्य होत नाहीत. त्यात व्यूहरचना, वेग, सैन्याची समर्पण भावना, देशभक्ती आणि बलिदान भाव सैन्याला विजय मिळवून देतो. गेल्या पाचशे वर्षातील या सर्व गुणांचे उत्कृष्ट उदाहरण पहिले बाजीराव पेशवे आहेत. त्यांनी त्यांच्या २० वर्षाच्या काळात मृत्यूपर्यंत लढलेली सर्व ४१ युद्धे जिंकली, असेही गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री यांनी काढले.

महान भारताची रचना ही शिवछत्रपतींची प्रेरणा आहे, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह म्हणाले, संपूर्ण दक्षिण भारत अनेक जुलमी सत्ताधीरांमुळे पीडित होता आणि उत्तर भारत मुघल साम्राज्याच्या अधीन  होता. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापनाच केली नाही तर युवक, बालक आदींच्या मनावर स्वराज्याचे संस्कार केले, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराज, वीर ताराराणी, संताजी -धनाजी आदी अनेक वीरांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ आणि नंतर पहिल्या बाजीरावांची पेशवा म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली.

पहिले बाजीराव यांचे स्मारक बनविण्याची सर्वात उचित जागा कोणती असेल तर ती ‘एनडीएच’. कारण येथून देशाच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख अधिकारी प्रशिक्षित होऊन बाहेर पडत असतात. येथून बाहेर पडताना श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जीवनकाळाचा अभ्यास करून जेव्हा भविष्यातील सेनानी जातील तेव्हा भारताच्या सीमांना स्पर्श करण्याचे धाडस कोणी करणार नाही. भविष्यात स्वराज्य टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागल्यास आपली सेना आणि नेतृत्व निश्चित करेल. ऑपरेशन सिंदूर हे याचे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *