देशातील विविध समुदाय, प्रदेशांची संस्कृती आणि त्यांच्या आजच्या गरजा समजून घेत देशातील प्रत्येकाच्या विशेषतः दुर्लक्षित घटकाच्या विकासाला सहाय्यकारी होऊ शकतील अशी सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा उत्पादने आणि बाजारपेठीय धोरणे बनवावीत, असा संदेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ लवळे येथे आयोजित २१ व्या पदवीप्रदान समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार, कुलगुरु डॉ. रामकृष्णन रमण, प्र. कुलगुरु विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
पदवीप्रदान सोहळ्यात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या, आज मुले आणि मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. नारी शक्तीचा विकास हा देशवासियांसाठी अभिमानाचा विषय आहे, शिवाय देशाच्या विकासाचाही तो एक महत्त्वाचा मापदंड आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात लिंग समानतेला प्राधान्य दिले जाते ही बाब प्रशंसनीय आहे. पदवीप्रदान सोहळ्यात सुवर्णपदक प्राप्त ११ विद्यार्थ्यांपैकी ८ मुली असल्यावरून मुलींच्या शिक्षणासाठीही येथे योग्य वातावरण आणि सुविधा दिल्या जातात, असे दिसून येते. मुलींना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासह त्यांच्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबवण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना केले.
जगातील अनेक भागातून या संस्थेत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार होण्यासह देश-विदेशात आणि विविध क्षेत्रात प्रभावी योगदान देण्यासाठी एक मजबूत संपर्क जाळे (नेटवर्क) देखील बनवतात. भविष्यात विदेशातील विद्यार्थी आपल्या देशात गेल्यावरही या संस्थेशी नाते कायम ठेवतील तसेच आपल्या आधुनिक ज्ञान आणि कौशल्यांचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करतील, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

