जवाहरलाल नेहरु विद्यापीठात माय मराठीच्या जागरासाठी थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषेचे अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली येथे ७० वर्षानंतर होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांनी मिळून यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडेकर, मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, माजी मंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूत भेट देण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिल्लीत साहित्य संमेलन होणे ही महाराष्ट्र, मराठी साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानाची बाब आहे. अशा संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे मोठेपण जगभरातील नागरिकांना कळायला हवे. साहित्यिकांचे समाजासाठी मोठे योगदान आहे, जीवनाचा अर्थ त्यांच्यामुळे कळतो, नवी पिढी घडविताना समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य साहित्यिक करतात. म्हणून अशा साहित्य संमेलनाचा समाज जागरणासाठी उपयोग होतो. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

