जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ‘ या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा- माऊली तुकाराम’….रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी… अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज इंदापूर तालुक्यात आगमन झाले. यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी
भवानीनगर येथे पालखी रथ आणि दिंड्यांचे दर्शन घेऊन स्वागत केले.

यावेळी इंदापुरचे तहसीलदार जीवन बनसोडे, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, इंदापुरचे सचिन खुडे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा
इंदापूर तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम सणसर, निमगाव केतकी, इंदापूर शहर आणि सराटी या ठिकाणी आहे. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका प्रशासन, इंदापुर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्यावतीने तयारी केली आहे.

जर्मन हँगर पद्धतीचे मंडप, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, फिरते वैद्यकीय पथके, मोफत औषधोपचार, चरणसेवा, हिरकणी कक्ष, निवारा केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फिरते सुलभ शौचालय, कचरा वाहतूक घंटागाडी, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक आदी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *