सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठरावीक मर्यादेची शिथिलता देण्यात येते. त्यापैकी अधिकाधिक दिवस गणेशोत्सवासाठी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४’ बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार हेमंत रासने, शंकर जगताप, श्रीमंती दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजक विलास कामठे, बापूसाहेब धमाले, कैलास भांबुर्डेकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

