आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील विविध खेळाडूंनी पदके मिळविली असून त्यांचे स्मरण करुन, आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंनी कामगिरी करावी; खेळाडू, संघटनांना येणाऱ्या अडअडचणी सोडविण्यासोबतच त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच खेळाडूंच्या पाठीमागे राज्य शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
क्रीडा व युवक कल्याण संचालनालय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक दिनानिमित्त सर परशुराम महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली- उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जाेशी, सुहास पाटील, विभागीय उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष प्रदीप गंधे, महासचिव नामदेव शिरगावकर, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे आदी उपस्थित होते.
जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा देत मंत्री श्री. भरणे म्हणाले, स्व. खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या ऑलम्पिक स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर २०२४ मध्ये स्वप्नील कुसळे यांनी दुसरे तर पॅरॉलिम्पिक स्पर्धेत सचिन खिलारी यांनी पदक मिळवले. राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळावे, त्याचे मनोधैर्य वाढावे, खेळात सातत्य टिकून राहण्याकरीता नोकरीत ५ टक्के आरक्षण, शासकीय सेवेत थेट नियुक्ती आदी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. सन २०२४-२०२५ मध्ये १४९ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे. बालेवाडी येथे ऑलम्पिक भवन उभारण्यात येत असून त्यामधून खेळाडूंना विविध सुविधा मिळणार आहे.

