आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामुळे युवकांना परेदशातील अनेक संधी मिळतील- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामुळे युवकांना परेदशातील अनेक संधी मिळतील- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

युरोपसह अनेक देशात कौशल्याधारित काम करणाऱ्या मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता असून येथील युवकांना परदेशात नोकऱ्या, रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी केले. आज स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामुळेही येथील युवकांना परदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व नॅशनल स्कील डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतन, बहिरट पाटील चौक, गोखले रस्ता, शिवाजीनगर येथे स्थापित ‘आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, एनएसडीसी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष नितीन कपूर, एनएसडीसीचे सल्लागार मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिंग कौरा आदी उपस्थित होते.

देशात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असून त्या सर्वांनाच नोकरी देण्याला मर्यादा असल्याचे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, पीढ्यान् पिढ्या शेती केल्यानंतर शेतीचे तुकडे झाल्यामुळे शेतजमीन खूप कमी झाली आहे. त्यामुळे एक जण शेतीत आणि एक जण शहरात, विदेशात नोकरीसाठी जावे लागेल. ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संस्था काढल्या परंतु चुकीच्या पद्धतीने चालवल्यामुळे त्यातीलही अनेक बंद पडल्या. त्यामुळे आता युवकांना कौशल्य देऊन, परदेशी भाषांचे शिक्षण देऊन बाहेर पाठवावे लागेल. त्यासाठी हे केंद्र चांगल्या प्रकारे काम करेल. या केंद्राच्या अनुषंगाने स्थानिक सल्लागार मंडळही बनवावे, अशी सूचनादेखील त्यांनी केली.

चार लाख विद्यार्थ्यांना जर्मनीत रोजगाराठी पाठविण्याचे शासनाचे उद्दिष्ट- दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, जगाची मनुष्यबळाची मागणी पाहता महाराष्ट्र शासनाने जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करुन 31 कौशल्यांशी संबंधीत मनुष्यबळ पुरविण्याबाबत तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार युवकांना व येत्या दीड वर्षात १ लाख तर एकूण ४ लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन जर्मनीत नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उदि्दष्ट ठरविले आहे. यासाठी निवड झालेल्या युवकांना कौशल्यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना गोएथे या संस्थेमार्फत येथील इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षित करुन त्यांच्यामार्फत युवकांना जर्मन भाषेचे ज्ञान देण्यात येणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *